सर्वसाधारणपणे कडक कायद्यांची गोष्ट आपण बोलतो ते इस्लामी देशातील कायद्यांच्या बाबतचीच असते, ज्यात दगडांनी ठेचण्यापासून थेट भर चौकात गोळ्या घालून ठार मारण्यापर्यंतची शिक्षा फर्मावली जात असते. यात अशी शिक्षा असली तर तसे प्रकार करणाऱ्यांना धाक बसतो असे आपण मानत असू तर ते साफ चूक आहे. आजही अशा देशात कायदे मोडणारे आहेतच, किंबहुना झटपट निर्णय लावण्याच्या पद्धतीत भावनेच्या भरात चुकीच्या माणसाला शिक्षा दिली गेली तर ती तो आरोपी मारूनच टाकल्यामुळे चूक दुरुस्त अथवा क्षमा करताच येत नाही. आपल्या भारतात या बाबतीत आपण अवलंबित असलेली पद्धत जरी वेळकाढू असली तरी त्यात सहसा आरोपीला भरपूर संधीच दिली गेली नाही हे होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. उलटपक्षी आपल्या भारतातील तुरुंगात खितपत पडलेल्या अनेक अंडरट्रायल्सबाबत विचार करावा अशी बाब आहे. कारण ज्याच्या गुन्ह्यासाठी १४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा असते तो त्याला ती शिक्षा सुनवली जाते तेव्हा कधी कधी २०-२५ वर्षे तुरुंगात सडत पडलेला असतो व शिक्षा ऐकल्यावर त्याच दिवशी त्याची सुटका केली जाते. मात्र त्याने भोगलेल्या अतिरिक्त तुरुंगवासासाठी त्याला काहीच परतफेड दिली जात नाही हे लक्षात घ्यावे.