इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करण्यात रिस्क? नवीन ईव्ही घेण्यापूर्वी केंद्राचा अहवाल जाणून घ्या

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्राहक आता पेट्रोल डिझेलवरील वाहनं सोडून इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करू लागले आहेत. असं चांगलं चित्र एका बाजूला असताना देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याच्या, बॅटरीचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबद्दल भीती आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्सना लागलेल्या आगीचा केंद्र सरकारने नेमलेल्या पथकाने तपास केला आहे. त्यांनी त्याबाबतचा अहवालदेखील सादर केला आहे. तो अहवाल जाणून घेण्याआधी समजून घ्या की, देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करण्यासाठी अनेक स्टार्टअप कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांची संख्या २२ च्या पुढे आहे. ग्राहकांना फुल-प्रूफ प्रोडक्ट देण्यासाठी सर्वच कंपन्यांकडे आर्थिक पाठबळ, उत्पादन कौशल्य, उत्पादन कार्यक्षमता नसते. त्यातही भारतीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहनं नवीन आहेत. त्यामुळे येथील ग्राहकांना त्यांच्यासमोरच्या उत्पादनाच्या क्वालिटीबद्दलची माहिती नाही. परिणामी बाजारात अडचणी उद्भवत आहेत.

​ईव्हीच्या गुणवत्तेशी तडजोड

एकीकडे इथल्या सर्वच ईव्ही स्टार्टअप कंपन्या या क्षेत्रात नवीन आहेत. दुसऱ्या बाजूला ग्राहक या इलेक्ट्रिक वाहनांबद्दल अनभिज्ञ आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची भारतीय बाजारपेठ अपरिपक्व आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ईव्ही निर्मितीबाबत गाईडलाईन्स जारी करणं गरजेचं आहे. सरकार सध्या त्यावर काम करत आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांनी थोडं थांबणं योग्य ठरेल. कारण सरकारच्या कोणत्याही गाईडलाईन्स (मार्गदर्शक तत्वे) नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी उत्पादनात गुणवत्तेशी तडजोड करून नफा मिळवणं सुरू केलं आहे. अधिक नफ्यासाठी अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेशी तडजोड करत आहेत.

​आगीच्या घटनांची चौकशी करण्याचे गडकरींचे आदेश

इलेक्ट्रिक टू व्हीलर्सच्या गुणवत्तेत तडजोड केल्यामुळे गेल्या काही महिन्यांत आगीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्योर ईव्ही आणि इतर स्टार्टअप्स कंपन्यांच्या स्कूटर्समध्ये आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (CFEES) विभागाला इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगीच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्रीय पथकाने आगीच्या घटनांचा, स्फोटांच्या घटनांचा तपास केला.

​इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये लागलेल्या आगींबाबत DRDO चा रिपोर्ट

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) हे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा एक भाग आहे. त्यामुळे सीसीपीएने या महिन्याच्या सुरुवातीला Pure EV आणि Boom Motors या दोन इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपन्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. नोटीसमध्ये त्यांच्या स्कूटरला लागलेल्या आगींमागची कारणं स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. अशा प्रकारची नोटीस इतरही काही इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपन्यांना पाठवल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. ज्यामध्ये ओला इलेक्ट्रिक, जितेंद्र ईव्ही आणि ओकिनावा ऑटोटेक यांचा समावेश होता.

​खराब क्वालिटीच्या साहित्याचा वापर

DRDO ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) आगीच्या घटनांची तपासणी केली. विशेष म्हणजे त्यांनी यामध्ये बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेची मदत घेतली. DRDO आणि भारतीय विज्ञान संस्थेने या घटनांची संयुक्तपणे तपासणी केली. त्यानंतर त्यांनी संयुक्तपणे सादर केलेला अहवाल हा ग्राहकांसाठी धक्कादायक आहे. या अहवालानुसार, डीआरडीओने म्हटले आहे की, प्रत्येक इलेक्ट्रिक व्हेईकलला लागलेल्या आगीच्या घटनेत वाहन निर्मात्या कंपनीने वाहन बनवताना कमी दर्जाचे किंवा खराब दर्जाचे स्वस्त साहित्य वापरले असावे, तसेच या ईव्हींच्या बॅटरीत दोष आढळले आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment