इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये मृतांचा खच; १९८ जणांचा मृत्यू, १६०० जखमी

शनिवारी सकाळी हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. हमासकडून एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या घटनेनंतर इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, इस्रायलकडून केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये सुमारे १९८ जणांचा मृत्यू झाला. तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने हमासने केलेल्या हल्ल्याचं वर्णन भीषण हल्ला असं केलं आहे.

हमासने भल्या पहाटे इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात किमान १०० लोक मरण पावले आणि ७४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असं वृत्त ‘रॉयटर्स’नं दिलं आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये किमान १९८ लोकांचा मृत्यू झाला तर १६१० लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान, इस्रायलकडून हमासच्या तळांवर हल्ले होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त शब्दांत युद्धाची घोषणा केली आहे. “ही ना कोणती मोहीम आहे, ना हा कुठला सामान्य गोळीबार आहे. हे युद्ध आहे. आपण युद्धात आहोत. हमासच्या दहशतवाद्यांना या युद्धात अद्दल घडवली जाईल. त्यांना असा धडा शिकवला जाईल, ज्याची त्यांनी कधीच कल्पनाही केली नसेल”, अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला ठणकावलं आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment