क्रेडिट कार्डमध्ये आधी ठरल्यानुसार एका विशिष्ट रकमेपर्यंत (क्रेडिट लिमिट) पैशांचा वापर करण्याची या कार्ड वापरणाऱ्यांना संधी मिळण्याची सोय असते. यात वस्तू खरेदीपासून काही प्रमाणात साधारणतः २०,०००/- पर्यंत रुपयेही काढता येतात. क्रेडिट कार्डमध्ये तुमच्या खात्यात रक्कम नसली तरी दिलेल्या रकमेपर्यंत (लिमिटपर्यंत) क्रेडिट कार्डधारकाला वस्तू घेता येतात वा पैसे काढता येतात. अर्थात हे एक प्रकारचे कर्जच असते. फक्त ते पोश असते. हे एक अनसेक्युअर्ड लोन असल्याने त्यावर बँका पठाणी व्याज लावतात. ही एक प्रकारची ओवरड्राफ्ट सुविधा असते. यातील क्रेडिट कार्डधारकास वापरलेले संपूर्ण पैसे त्वरित त्याच महिन्यात भरावे लागत नाही. किमान भरावयाचे पैसे भरून सदर क्रेडिट कार्डधारक, पुढील काही महिन्यांत ते पैसे पूर्ण भरू शकतो. खऱ्या अर्थाने क्रेडिट कार्डधारकाने कर्जाऊ काढलेल्या पैशांचे व्याज बँकेला फायदा मिळवून देत असते. तरुणांमध्ये आजूबाजूंवर इम्प्रेशन मारण्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर अधिक असतो.
पूर्वी कार्ड घेण्यासाठी क्रेडिट कार्डधारकास पैसे पडायचे नाही. मात्र आज बहुतांशी बँका क्रेडिट कार्डधारकाकडून वापर करण्याबद्दल वार्षिक शुल्क आकारते. याच्या उलटपक्षी डेबिट कार्ड असते. बँकेचे डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या खात्यातील असलेल्या रकमेचा वापर करण्याची संधी. डेबिट कार्डमध्ये जेवढी रक्कम असते तेवढीच तुमची क्रेडिट असते. म्हणजे यात तुमच्या खात्यात रक्कम नसली किंवा कमी असली तर आगाऊ (क्रेडिट) रक्कम मिळण्याची सोय नसते. हे कार्ड म्हणजे बँकेच्या शाखेऐवजी ए.टी.एम. असलेल्या ठिकाणी पैसे काढण्याची उपलब्ध होणारी संधी. इथे कार्डाचा वापर म्हणजे विशिष्ट बँकेच्या शाखेऐवजी त्या बँकेच्या कोणत्याही ए.टी.एम. मधून वापर करायचा असेल त्या ठिकाणी त्याचा थेट करण्याची व पैसे जेथे काढण्याची संधी प्राप्त होणे.