ज्याप्रमाणे पुत्रांना पित्याच्या मिळकतीत वाटा मिळतो तद्वतच कन्येलादेखील तसाच वाटा पित्याच्या मिळकतीमध्ये मिळतो. कन्येच्या वडिलोपार्जित मिळकतीमधील वाट्यासंबंधी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत, त्या अशा :
१) कन्येला पुत्राइतकाच हिस्सा आपल्या पित्याच्या मिळकतीत मिळतो.
२) पित्याच्या मिळकतीत हिस्सा मिळण्यासाठी तिने सच्छिल राहिलेच पाहिजे असा काही नियम नाही.
३) कन्येने पुनर्विवाह केला तरी तिच्या हक्काला बाधा येत नाही.
४) कन्येला राहत्या घरांची वाटणी इतर पुरुष हिस्सेदाराची वाटणी करायची ठरविल्याशिवाय मागता येणार नाही.
५) कन्येला तिच्या वडिलोपार्जित मिळकतीमधील मिळालेला वाटा हा तिचा स्वकष्टार्जित संपत्ती असल्यासारखा समजला जातो. त्यामुळे त्या वाट्यात अन्य कुणाचाही हक्क लागू होत नाही. म्हणजेच कन्या ही एक अर्थाने सदर मिळकतीची पूर्णांशाने मालक बनते.
६) याउलट पुरुष सहहिस्सेदाराला जर त्याचा वाटा मिळाला तर त्या वाट्यात त्याच्या पत्नी-मुलांचे हक्क पोचतात. त्या दृष्टीने विचार केला तर पुरुषापेक्षा म्हणजेच मुलापेक्षा मुलीला मिळालेली मालकी ही अधिक चांगल्या तऱ्हेने मिळते.
७) एखाद्या पित्याने आपल्या अविभक्त कुटुंबातील काही मिळकतीचा भाग आपल्या कन्येस बक्षीस म्हणून दिला तरी त्याचा परिणाम वडिलोपार्जित मिळकतीवर कन्येस मिळणाऱ्या वाट्यावर होत नाही.
८) कन्या ही विवाहित, गरीब-श्रीमंत अथवा मूलबाळ नसलेली असली तरी त्याचा परिणाम तिला मिळणाऱ्या तिच्या वडिलोपार्जित हिश्श्यावर होत नाही.
या ठिकाणी आणखी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे पहिल्या पतीपासून होणाऱ्या कोणालाही (मुलगा अथवा मुलगी) या सर्वांना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये समान वाटा मिळतो. नवीन कायद्यानुसार म्हणजे १९५६ साली मंजूर झालेल्या हिंदू दत्तक आणि पोटगी या कायद्याप्रमाणे दत्तक ज्याला घ्यायचा ती व्यक्ती अविवाहित असणे आवश्यक आहे. परंतु पूर्वी धर्मशास्त्राप्रमाणे दत्तक जाणारी व्यक्ती विवाहित असली तरी चालत असे. या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जर एखाद्या पुरुषाला दत्तक जाण्यापूर्वी संतती झाली असेल व त्यानंतर तो दत्तक गेला असेल तर दत्तक गेलेल्या पित्याच्या दत्तक- पूर्व संततीला म्हणजेच दत्तक जाण्यापूर्वी झालेल्या संततीला दत्तक गेलेल्या घराण्यातील मिळकतीमधील हिस्सा मिळतो. म्हणजेच संतती आणि पित्याचे नाते दत्तक गेल्याने नष्ट होत नाही. पूर्वमृत मुलाची कन्या, पूर्वमृत मुलीची कन्या, पुर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची कन्या या सर्वांना वरील तरतुदी लागू होतात.
Bhadekaru asalyas mulincha samaan hakka rahto ka