टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो घेताना काय काळजी घ्यायची? Term Insurance information in Marathi.

पैशाची गोष्टमध्ये मागच्या आठवड्यात आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स पाहिले. इन्शुरन्सची संकल्पना आणि त्याची गरजही समजून घेतली.

या आठवड्यात आपण टर्म इन्शुरन्सबद्दल जाणून घेऊ या. खरंतर जाणकारांच्या मते टर्म हाच खरा इन्श्युरन्स आहे. पण, असं त्यांना का वाटतं आणि का घ्यायचा टर्म इन्शुरन्स?

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरुपी विमा. पैकी टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात.

पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.

पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्सचा फरक आहे.

टर्म इन्शुरन्सची गरज काय?

इन्शुरन्स तज्ज्ञ मिलिंद बने यांच्या मते, टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतं.

“घरातली कर्ती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबीयांच्या सर्व आर्थिक गरजा भागवत असते. शास्त्रीय परिभाषेत या जबाबदारीची मोजदाद मानवी जीवन मूल्यामध्ये होत असते”, बने सांगतात.

“घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या तर अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे दीड-दोन कोटींच्या घरात जातं. आणि मिळकत कमी असो किंवा जास्त, इतक्या रकमेची शाश्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय आहे टर्म इन्शुरन्सचा.”

“कमी हप्त्यात मोठा फायदा इथं मिळत असतो. त्यासाठी हा इन्श्युरन्स महत्त्वाचा आहे,” मिलिंद बने यांनी टर्म इन्श्युरन्सचा अर्थ समजून सांगितला.

इन्शुरन्स उचलतो आर्थिक जबाबदारी

अलीकडे शहर असो किंवा ग्रामीण भाग. जवळ जवळ प्रत्येकावर गृहकर्ज असतं. त्यासाठी टर्म इन्शुरन्स खूप मोलाचा आहे. कर्जाची परतफेड ही मोठी आर्थिक जबाबदारी आहे. काही लाखांत किंवा कधी कधी कोटींमध्ये ही कर्जाची रक्कम असते.

दुर्दैवाने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कर्ज फेडण्यापूर्वीच झाला तर? ही कल्पना भयावह आहे. कारण, हा भार आता त्यांच्या नॉमिनीला उचलावा लागणार आहे.

“पण, टर्म इन्शुरन्स एकरकमी पैसे देत असल्यामुळे तुम्ही गेल्यानंतरही ही जबाबदारी इन्शुरन्स घेतो,” बने यांनी टर्म इन्श्युरन्सचा आणखी एक फायदा सांगितला.

टर्म इन्शुरन्स किती रकमेचा हवा यावरही त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन विषद केला. “एक पद्धत आहे ज्यात तुम्ही किती वर्षं नोकरी करणार आहात हे महत्त्वाचं ठरतं. त्या काळात तुम्ही जमा केलेली रक्कम आणि पुढच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विम्याची रक्कम ठरवणं ही ती पद्धत.”

“तर दुसऱ्या पद्धतीत महागाईचा दर पुढे किती वाढणार आहे. त्या अंदाजाने या दरावर आधारित विम्याची रक्कम ठरवणं,” मिलिंद बने यांची ही माहिती थोडी क्लिष्ट वाटेल कदाचित. पण, गुंतवणूक तज्ज्ञ तुमच्यासाठी हे गणित सोपं करू शकतील.

टर्म इन्शुरन्सची वैशिष्ट्यं

टर्म इन्शुरन्सचं महत्त्व आपण समजून घेतलं. आता बघू या त्याची वैशिष्ट्यं

  • टर्म इन्श्युरन्सचा हप्ता तुलनेनं अगदी कमी असतो.
  • कमी हप्त्यात विमा संरक्षण मात्र तगडं मिळतं. अर्थात मुदतीनंतर तुम्ही जीवंत असाल तर लाभ मात्र मिळत नाही.
  • ज्याच्या नावावर टर्म इन्श्युरन्स आहे, त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची पूर्ण रक्कम मिळते
  • काही टर्म प्लानबरोबरच अतिरिक्त फायदे(ज्यांना रायडर बेनिफिट म्हणतात) मिळत असतात. उदा. थोडा जास्त हप्ता भरलात तर आरोग्य विम्याचे काही फायदे मिळू शकतात.
  • हे इन्श्युरन्स देणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे
  • मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो. तो बदलत नाही

टर्म इन्शुरन्सबद्दल हे माहीत आहे का?

टर्म इन्शुरन्समुळे पैसे वाढत नाहीत. हे गुंतवणुकीचं साधन नाही. त्यातून तुमच्या हयातीत तुम्हाला पैसा मिळत नाही. मात्र तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात.

म्हणून हा इन्श्युरन्स कमावत्या व्यक्तीच्या नावे घेतला जातो.

वाढत्या वयाबरोबर टर्म इन्शुरन्सचा प्रीमिअम वाढत जातो. जशी मुदत संपल्यावर तुम्हाला जिवंत असताना लाभ मिळत नाही, तसंच या विम्यावर तुम्हाला कर्जाची उचलही करता येत नाही

टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी…

मुदतीनंतर लाभ मिळणार नसला तरीही आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना जोखीम कमी करणारा म्हणून महत्त्वाचा असा हा प्रकार आहे. तो घेण्याचा निर्णय झाल्यावर या गोष्टींवर जरुर लक्ष द्या.

-इथं एक जरी हप्ता चुकला तरी विमा पॉलिसी रद्द होण्याची भीती असते. त्यामुळे हप्ता नियमित भरा.

-टर्म इन्श्युरन्स घेताना फॉर्म बिनचूक भरा. तंबाखू किंवा सिगरेटचं व्यसन असेल तर तसं न चुकता लिहा. त्यामुळे नॉमिनीला पैसे मिळताना अडचण येणार नाही. स्वत:विषयी खरीखुरी माहिती द्या.

इन्शुरन्स तज्ज्ञ मिलिंद बने यांनी दिलेला आणखी एक सल्ला म्हणजे इन्शुरन्स ऑनलाईन घेण्यापेक्षा त्यातल्या तरतुदी समजून घेऊन निर्णय घ्या.

इन्शुरन्स देणारी कंपनी, तिची बाजारातली पत, विम्याची रक्कम देण्याची गुणवत्ता (याला क्लेम सेटलमेंट असं म्हणतात) याचा विचार करून निर्णय घ्या.

त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, ‘रुग्णालय किंवा मुलांसाठी शाळा निवडताना आपण स्वस्त ती सेवा घेत नाही तर पारखून कुठे जायचं ते ठरवतो. तीच काळजी इन्शुरन्स खरेदी करताना घ्या.’

(डिस्क्लेमर – टर्म इन्शुरन्सबद्दल ही प्राथमिक माहिती आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.)

हे वाचलंत का?

Sharing Is Caring: