आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जी काही आर्थिक तरतूद करतो, त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे विमा पॉलिसी किंवा इन्श्युरन्स.
जीवनात पुढे काय होणार हे माहीत नसतं. आणि म्हणूनच या अज्ञाताचं रूपांतर जोखमीत होतं. अशा वेळी इन्श्युरन्स हा पर्याय आर्थिक जोखीम उचलण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो.
अर्थ विश्लेषक किंवा गुंतवणूक तज्ज्ञ यालाच जोखमीचं विकेंद्रीकरण असं म्हणतात. सातत्याने अर्थविषयक लिखाण केलेले वसंत कुलकर्णी यांनी हाच मुद्दा समजावून सांगितला.
“घरखर्च भागवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, भविष्यातल्या काही आर्थिक गरजा यासाठी आपण बचत करतो. पण हे खर्च आपल्याला माहीत असलेले आहेत. काही खर्च असे आहेत जे अचानक उद्भवतात. आणि त्यासाठी आपली बचत पुरी पडेलच असं नाही,” ते सांगतात.
“इन्श्युरन्समुळे असे खर्च आपण भागवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा अशा योजना आपल्याला अशा खर्चांसाठी मदत करतात,” कुलकर्णी यांनी इन्श्युरन्सचा अर्थ समजावून सांगितला.
- मुलांसाठी खास पॉलिसी, फक्त 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा परतावा मिळवा
- विमा (Insurance) म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत?
विम्याचे प्रकार आणि फायदे
“विम्याचा छोटा हप्ता भरून तुम्ही भविष्यातल्या मोठ्या खर्चाविरुद्ध संरक्षण मिळवत असता. म्हणूनच पर्सनल फायनान्सच्या भाषेत याला जोखमीचं विकेंद्रीकरण असं म्हणतात.”
तर पाहूया विविध विमा योजना आणि त्या खरेदी करताना घ्यायची काळजी.
विमा योजना ढोबळ मानाने दोन प्रकारच्या आहेत – जनरल आणि आयुर्विमा.
जनरल म्हणजे मृत्यू व्यतिरिक्त इतर संरक्षण देणारा विमा. त्याची मुदत एक वर्षं, त्यापेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षांची असते.
जनरल विम्यामध्ये वाहन विमा, आरोग्य विमा, कमर्शिअल विमा, पर्यटन विमा, गृह विमा आणि सागरी विमा, असे उपप्रकार आहेत.
आणि नावांप्रमाणेच या विम्याचे फायदे आहेत. उदाहरणार्थ, वाहन विमा आपल्याला वाहनाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देतो. तर पर्यटन विमा सामान हरवणं किंवा पर्यटनाच्या ठिकाणी झालेली चोरी याविरुद्ध संरक्षण देतो.
दुसरा प्रकार आहे तो आयुर्विमा. घरातली कमावती व्यक्ती अकाली गेली तर त्याच्यावर अवलंबून लोकांचं काय, असा प्रश्न त्या व्यक्तीला भेडसावत असतो. त्यांच्यासाठी आहे आयुर्विमा.
हा विमा तुमच्या जीविताची काळजी घेतो. मुदतीनंतर एक तर एकगठ्ठा पैसा तुम्हाला मिळतो नाहीतर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते.
त्यामुळे कमावत्या व्यक्तीच्या नावावर विमा असावा, असा संकेत आहे.
- WhatsApp यूजर्ससाठी खुशखबर, ‘या’ जबरदस्त फीचरमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
- ‘या’ सरकारी कंपनीत विविध पदांवर बंपर भरती, एक लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या भरतीची संपूर्ण माहिती
याचेही प्रकार आहेत. आयुर्विमा, एन्डॉमेंट योजना, टर्म प्लान, मनी बॅक योजना, चिल्ड्रन प्लान किंवा युनिट लिंक्ड प्लान म्हणजेच ULIP.
शेअर बाजारात मिळणारा परतावा पाहता अलीकडे म्युच्युअल फंडाच्या धर्तीवर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजनाही निघाल्या आहेत. त्यांनाच ULIP असं म्हणतात.
आपल्या गरजेनुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्याने कुटुंबासाठी योग्य विमा योजना आपल्याला निवडायची आहे.
इन्श्युरन्सचे फायदे
विमा हे आर्थिक संरक्षण तर आहेच. त्याशिवाय आणखी काही फायदे आपण मिळवत असतो.
– ज्याच्या नावावर पॉलिसी आहे त्याला करबचतीचा फायदा मिळतो.
– मालमत्तेचा विमा काढलेला असेल तर व्यापाऱ्याला ती मालमत्ता ठेवून कर्ज मिळतं.
– विमा ही भविष्यातली आर्थिक तरतूद आहे
– विम्यामुळे बचतीची सवय लागते
विमा योजना घेण्यापूर्वी…
– आपण घेत असलेल्या योजनेतल्या तरतूदी समजून घ्या. दोन योजनांमध्ये तुलना करून आपल्यासाठी अधिक योग्य वाटणारी योजना निवडा.
– आपली आर्थिक गरज, आपलं वय आणि मिळकत पाहून निर्णय घ्या.
– हप्ता कधी आणि किती भरायचा आहे हे नीट तपासा. कुटुंबातल्या सदस्यांना हप्त्याची माहिती द्या.
– हप्त्याची वेळ चुकवू नका. त्यामुळे तुमचा विमा रद्द होऊ शकतो.
– विमा योजनेच्या अटी आणि शर्ती समजून घ्या. अनेकदा एका योजनेबरोबरच तुम्हाला रायडर किंवा इतर फायदे मिळत असतात. त्यामुळे नवीन विमा योजना घेण्याचा तुमचा खर्च वाचू शकेल.
उदा. दुर्घटना मृत्यू लाभ, गंभीर आजारावर संरक्षण आणि त्याचबरोबर अपंगत्वावर मिळणारा लाभ तुम्हाला एका विम्यात मिळू शकतो
– विमा कंपनीने यापूर्वी किती जणांना किती वेळात विम्याची रक्कम दिली आहे, ही माहिती आपल्याला कंपनीच्या साईटवर मिळत असते. कंपनीचा रेकॉर्ड बघूनच कंपनी आणि विमा योजनेची निवड करा.
या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांनी दिला आहे.
“विमा कंपनीचे एजंट असतात त्यांच्यापासून सावध राहा. कमिशनसाठी हे एजंट चुकीची विमा योजना आपल्या गळी उतरवतात. तेव्हा नीट अभ्यास केल्याशिवाय विमा निवडू नका,” असं कुलकर्णी यांचं सांगणं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विमा ही भविष्यातल्या आर्थिक संकटांसाठी केलेली तरतूद आहे. पण अनेकदा गुंतवणूकदार गुंतवणूक आणि आर्थिक संरक्षण यामध्ये गल्लत करतात.
कुलकर्णी यांच्या मते घरातली कमावती व्यक्ती एक असताना सगळ्यांच्याच नावाचा विमा काढला जातो. किंवा गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे एकतर पैसे अडकतात. आणि दुसरं म्हणजे या रकमेवर जो जास्त आकर्षक परतावा बाहेर मिळू शकला असता तो कमी होतो, असं कुलकर्णी सांगतात.
त्यामुळे शक्यतो आपल्या पश्चात आपल्या निकटवर्तीयांना आर्थिक फायदा मिळवून देणारा टर्म प्लान निवडावा, असं ते म्हणतात.
(डिस्क्लेमर – विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
हे वाचलंत का?
- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो घेताना काय काळजी घ्यायची?
- ई श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढाय चं? या कार्ड चे नेमके फायदे काय?
- ई-श्रम कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा