सामान्य माणसांना न्यायालयीन नोटिस कधी येऊ शकते?

न्यायालय, कायदा, शिक्षा इत्यादि गोष्टींना आपण सगळेच जरा घाबरतो. त्यात थेट न्यायालयाकडून आपल्याला एखादी नोटीस येणं म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट ठरते. पण नक्की कोण कोणत्या कारणांनी न्यायालयाकडून नोटीस येते आणि नोटीस आल्यावर काय करावं जाणून घेऊया आजच्या लेखात.

नोटीस म्हणजे काय ? नोटीसमध्ये काय असतं.

नोटीस ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे जी न्यायालयाकडून एका व्यक्तीस पाठवली जाते. मुळातच नोटीसमध्ये आपल्यासाठी सूचना, मार्गदर्शन आणि आपल्या चुकीसंबंधीत माहिती दिलेली असते. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट घटनेसाठी जागृत करणं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्याआधी त्याची बाजू मांडण्याची संधी देणं हा नोटीसचा उद्देश असतो.

नोटीस कधी येऊ शकते? काय कारणं असतात.

१. चेक बाऊन्स झाला तर

जर एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या बँकेत असणाऱ्या रकमेपेक्षा अधिक रकमेचा चेक दिला तर तो चेक बँकेकडून बाऊन्स केला जातो. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीची चेकबाबत फसवणूक केली त्याच्याकडून न्यायालयीन कारवाई केली जाते. शिवाय बँकेकडून कायदेशीर नोटीस आपल्याला येते. अनेकदा आपल्या सहीमध्ये तफावत असेल तरी देखील चेक बाऊन्स होतो. म्हणून चेक बाऊन्स झाला तर आपल्याला बँकेतील डॉईकडून न्यायालयीन नोटीस पाठवली जाते.

२. विजेचं बिल

आपल्या घरचं, ऑफिसचं किंवा आपल्या मालकी हक्काच्या वीज वापरत असलेल्या कोणत्याही ठिकाणी जर विजेचं बिल वेळच्या वेळी भरलं नसेल किंवा वीज बिलावर दिलेली तारीख उलटून ही आपण बिल भरण्यास दिरंगाई करत असू तर आपली वीज कापण्याच्या पंधरा दिवस आधी आपल्याला न्यायालयीन नोटीस महावितरण मंडळाकडून पाठवली जाते.

३. आयकर भरला नसल्यास

जर आपण वेळच्या वेळी आपला आयकर भरला नसेल तर आयकर विभागाकडून न्यायालयीन नोटीस येते. कॅलक्युलेशन मधील चूका, उत्पन्न योग्य पद्धतीने न भरणं किंवा अधिक प्रमाणात नुकसान दाखवलं तर अशा कारणांनी न्यायालयीन नोटीस आपल्याला पाठवली जाते.

४. कर्जाची थकबाकी असल्यास

जर आपण बँकेकडून कोणत्याही कारणांसाठी कर्ज काढलं असेल मात्र त्या कर्जाचे हफ्ते आपण भरत नसू किंवा थकबाकी असेल तर बँकेकडून कर्ज वसुलीसाठी न्यायालयीन कारवाई केली जाते.

५. इतरांच्या कर्जासाठी साक्षीदार

आपला मित्र किंवा नातेवाईक असं कोणीही त्यांच्या अडचणीसाठी कर्ज काढत असेल आणि त्यावेळेस साक्षीदार म्हणून आपण सही दिली असेल तर पण त्या व्यक्तीने काही काळाने ते कर्ज फेडलं नसेल तर साक्षीदार म्हणून ते कर्ज भरण्यासाठी आपल्याला नोटीस पाठवली जाते.

६. जागेचा गैरवापर

आपण एखाद्या जागेचा चुकीचा वापर करत असू तिथे बेकायदेशीर व्यवसाय किंवा बांधकाम केलं असेल तर त्या साठी देखील आपल्याला न्यायालयाकडून नोटीस पाठवली जाते.

७.सरकारी कर्मचारी

आपण जर सरकारी कर्मचारी असू तर आपल्या गौरहजेरी, गैरवर्तन किंवा कोणत्याही प्रकारचा घोटाळा अशा विविध कारणांनी नोटीस येते.

नोटीस आल्यानंतर काय करावं –

१. न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस आल्यास सर्वात आधी घाबरुन जाऊ नका.

२. संबंधीत चौकशी सुरु असेल तर आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे सादर करा.

३. नोटीस व्यवस्थित वाचा. आपल्याला कोणत्या करणासाठी नोटीस आली आहे आणि त्याचं गांभीर्य किती आहे हे लक्षात घ्या.

४. त्या नोटीसला किती दिवसात उत्तर देणं अपेक्षीत आहे हे जाणून घ्या.

५. नोटीसला उत्तर देण्यासाठी जी मुदत दिली गेली आहे त्यावर आपलं उत्तर देणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. उत्तर न दिल्यास आपल्याला संबंधीत विभागाच्या नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.

६. जर आपल्याला संबंधीत गोष्टीची माहिती नसेल तर ओळखीतील जाणकारांकडून किंवा त्या विभागातील तज्ञांकडून माहिती घेऊन ते प्रकरण तुम्ही हाताळू शकता.

जर तुम्हाला कधी अशा कोणत्याही कारणांनी नोटीस आली, तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे न घाबरता एकेक कृती करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या मित्र परिवारालाही जागरूक करण्यासाठी हा लेख नक्की पाठवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment