सरकारी नोकरीला एवढी डिमांड का आहे???

प्रत्येकाला वाटत असतं की आपली नोकरी स्थिर, सुरक्षित असावी. अचानक आपल्या नोकरीवर गदा येऊ नये. पण आजच्या स्पर्धेच्या काळात अशी अनेक प्रकरणं आपल्याला दिसून येतात ज्यामध्ये अचानक नोकरी गेली किंवा ती कंपनीच बंद पडली वगैरे. त्यामुळे खाजगी ठिकाणी नोकरी करणं तितकंस सुरक्षित दिसत नाही. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांची क्रेझ पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. नोकरीची सुरक्षा, स्थिर नोकरी, सरकारी सुविधा, पेन्शन, सुट्ट्या या सगळ्याचाच विचार करुन तरुणवर्ग सरकारी नोकरीकडे वळतो आहे.

चांगलं आयुष्य जगण्यासाठी, आजच्या महागाईत टिकाव लागण्यासाठी चांगली नोकरी असणं अत्यंत गरजेचं आहे. खाण्या – पिण्यापासून ते वैद्यकीय खर्च, प्रवास सर्वच खर्च वारेमाप वाढले आहेत. यात तग धरायचा असेल तर चांगल्या व स्थिर नोकरीशिवाय पर्याय नाही. काही खाजगी कंपन्यादेखील कर्मचाऱ्यांना गल्लेलठ्ठ पगार देतात. मेडिकलसह, प्रवासाच्या वेगवेगळ्या सुविधा देतात. कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न या सुविधांमधून केला जातो. परंतु, कामाचा प्रचंड भार, ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळेचे काम, सुट्ट्यांची कमतरता, यामुळे खाजगी नोकरी करणारा हताश होतो आहे. त्यात अनेक ठिकाणी कामाच्या तुलनेत मोबदलाही तितकासा मिळत नाही. अशावेळी सरकारी नोकरीच मिळाली तर बरी, निदान तिथे आयुष्य तरी चांगलं जगता येईल आणि निवृत्तीनंतरही पेन्शनची सोय होईल, असा विचार मनात यायला लागतो. याच विचाराने तरुणांचा सरकारी नोकरीकडे कल वाढत चालला आहे. एकदा तिथे चिकटलो की झालं अशी मानसिकता त्यामुळेच आपल्याकडे तयार झाली आहे.लग्न ठरवताना मुलाची कौटुंबिक पार्श्वभूमी बघण्याबरोबरच तो कुठे काम करतो हे साहजिकच पाहिलं जात असतं. जर तो व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल तर सोन्याहून पिवळं समजलं जातं. अशा स्थळांनाही समाजात फार ‘डिमांड’ असतो. त्यामुळे त्या मुलाला खुश करण्यासाठी, तो, त्याच्या घरचे मागेल तितका हुंडा द्यायलाही मुलीकडचे तयार असतात. आजही सर्रास या गोष्टी दिसून येतात. ही परिस्थिती तिशीतल्या खाजगी नोकरी करत असलेल्या मुलाबाबत तितकी नसते. आज तो जिथे काम करतो, तिथे उद्या करेलच, याची काही शाश्वती नसते. शिवाय, खाजगी कंपन्या हल्ली एक, तीन, पाच वर्षांच्या करार तत्वावरच कर्मचारी नेमत असतात. तितके वर्ष पूर्ण झाले की आपला करार पुढे वाढवला जाणार की नाही, या भीतीची टांगती तलवार सतत डोक्यावर असते. त्यामुळे नोकरीची स्थिरता आहे, असेही म्हणता येत नाही. यातूनच खाजगी आणि सरकारी नोकऱ्यांचं समाजातल्या प्रतिबिंब कसं आहे हे आपल्याला दिसून येतं.

खाजगी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या अंतरामुळेच मुलांचा सरकारी नोकऱ्यांकडे कल वाढतो आहे. पण नोकरी भरतीमध्ये होणारी टाळाटाळ, चालढकल, वेगवेगळ्या परिक्षांमध्ये उघडकीस येणारे घोटाळे, प्रचंड स्पर्धा, पास होऊनही नोकऱ्या नाही, ही आव्हानेदेखील सरकारी नोकऱ्यांपुढे आहे. ही आव्हानेही तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे. गेल्या वर्षी परीक्षा पास होऊनही रुजू करुन घेतले जात नसल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतरही अशाच प्रकारची प्रकरणे समोर आली. यातून सरकारी नोकऱ्यांमधला ढिसाळ कारभार दिसून आला.

वर्षानुवर्षे सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षांची तयारी करुनही मुलांच्या हातात काहीच पडत नसल्याचेही वास्तव आहे. एकएका जागेसाठी हजारो लोकांचे अर्ज व्यवस्थेकडे केले जात आहेत. त्यातल्या काही जणांचाच प्रत्यक्ष नोकरी मिळते. त्यामुळे ज्याला सरकारी नोकरी मिळाली तो आजच्या काळात राजा ठरतो आहे. पण, सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करताना ‘प्लॅन बी’चाही विचार आपण केला पाहिजे. नाही मिळाली अशी नोकरी तर काय करायचं, याचा विचार करुन ठेवणं आपल्या करीअरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण सुरक्षेच्या दृष्टीने सरकारी नोकरीकडे बघणं ठीकच पण तरुणांनी त्यातल्या आव्हानांवरही एक नजर टाकली पाहिजे. नाहीतर भ्रमनिरास होऊन त्यातून नैराश्यापलीकडे काहीही साध्य होणार नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment