शेतीसाठी ७/१२ व्यतिरिक्त इतर महत्त्वाची कागदपत्रे कोणती असतात?

१) गाव नमुना सहा ‘अ’- या दप्तरात किंवा दस्तऐवजात ज्या प्रकरणावरून वाद-विवाद उत्पन्न झालेले असतात अशा प्रकरणाची ही नोंदवही असते. यामधील नोंद मंजूर झाली की ती ७/१२ च्या उताऱ्यावर उतरवली जाते.

२) गाव नमुना सहा ‘ब’- या नोंदवहीत कलम १५२ प्रमाणे दंडवही असते. यामध्ये हक्कबदलाच्या अनुषंगाने येणाऱ्या (कलम १५२) प्रकरणांची नोंद असते.

३) गाव नमुना सहा ‘क’- या दप्तरात किंवा उताऱ्यात वारसांच्या हक्कांच्या नोंदी असतात. एखाद्या मालमत्तेला दप्तरी दाखला असे किती लोक वारस आहेत वगैरे सर्वांचे ज्ञान त्या वही / रेकॉर्डमार्फत होते.

४) गाव नमुना सहा ‘ड’- यामध्ये जमिनीतील जे नव्याने पोटहिस्से पाडले जातात त्याच्या नोंदी या दप्तरातील रेकॉर्डमध्ये येतात. थोडक्यात सांगायचे झाले तर जमिनीच्या अनुषंगाने ७/१२ व गाव नमुना ६ ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ ही दोन महत्त्वाची दप्तरे (रेकॉर्ड्स) आहेत. ७/१२ हे गाव नमुना ६ चे प्रतिबिंब असते (मालकी हक्कांच्या बाबतीत) असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. एवढेच काय, गाव नमुना सहाबद्दल आपणाला असे म्हणता येईल की गाव नमुना सहा व त्याचा भाग ही म्हणजे जणू काही जमिनीची दैनंदिनीच होय. रोज घडणाऱ्या घटना जशा दैनंदिनीमध्ये नोंदवल्या जातात, तद्वतच जमिनीच्या अनुषंगाने मालकी हक्कात, पोटहिश्श्यात होणारे बदल हे या दप्तरात नोंदवले जातात. ही प्रक्रिया कधीही पुरी न होणारी असते. सातत्याने चालूच राहते.

५) गाव नमुना आठ- हे दप्तरदेखील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, यामध्ये एका गावात एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे हे समजू शकते. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला आपल्या नावावर किती जमीन आहे हे समजते. तसेच एखाद्या जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीला आपण सदर जमीन विकत घेऊन त्याला भूमिहीन तर करत नाही ना, याचे ज्ञान होते. त्यामुळेच हा उतारा महत्त्वाचा ठरतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment