दुपारची झोप प्रमाणापेक्षा वाढली तर काय आजार होतात?

झोप ही आपल्या शरीरमनाच्या स्वास्थ्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याबाबत तडजोड करु नये, असं वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. पण काही लोकांना दुपारी झोपण्याची, वामकुक्षी घेण्याची सवय असते. दुपारची वामकुक्षी आरोग्यदायी असतेच. पण जर वामकुक्षी म्हणत आपण दुपारी तासाभरापेक्षा जास्त वेळ झोप काढत असू तर ती आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते. ती कशी ते आपण या लेखातून जाणून घेऊ.

१. ह्रदयाचा आजार होण्याची भीती

ह्रदयाच्या आजाराचं प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलं आहे. बदललेली जीवनशैली हे त्यामागचं प्राथमिक कारण दिसून येतं. दुपारच्या झोपेचाही मनुष्याच्या ह्रदयावर परिणाम होतो. मानवी आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून तीन लाख लोकांच्या झोपण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासातून दुपारी जास्त वेळ झोपल्याने तुम्हाला ह्रदयाला आजार होऊ शकतो आणि अकाली निधनसुद्धा होऊ शकतं असा निष्कर्ष समोर आला आहे.

२. आजारांना निमंत्रण

दुपारी झोपणं म्हणजे आजारांना निमंत्रण आहे. जर तुम्ही ४० ते ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला पचनाचे आजार होऊ शकतात. ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल लेव्हल वाढणे, रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढणे असे आजार होऊ शकतात. त्यामुळे ४० मिनिटं ते जास्तीत जास्त ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोप घेणं शक्यतो टाळावं.

३. रात्रीची झोप दुपारी नाही..

पिटसबर्ग नावाच्या विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनीही दुपारच्या झोपेवर अभ्यास केला आहे. काही लोकांना रात्री शांत झोप येत नाही. त्यामुळे ती झोप दुपारी भरुन काढण्याचा प्रयत्न ते करतात. पण ही मोठी चूक असल्याचं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. कारण असं केल्यामुळे रात्रीची झोप आणखीनच कमी होते आणि शरीराला दुपारीच जास्त झोप लागण्याची शक्यताही वाढते.

४. ३० मिनिटांपेक्षा जास्त पॉवर नॅपने नुकसान

अनेकांना दुपारी पॉवर नॅप म्हणजे विश्रांती घेण्याची सवय असते. ही झोप ३० मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळेची असावी. ज्यांना पॉवर नॅपची सवय नाही त्यांनी जाणूनबुजून ती लावू नये. पॉवर नॅपमुळे शरीर आणि मनावरचा थकवा दूर व्हायला मदत होते आणि आपला मूडपण छान होतो. पण त्यापेक्षा जास्त वेळ बेडवर पडून राहिलो तर आपण नॅपचं रुपांतर गाढ झोपेत होऊ शकतं आणि शरीरातला उत्साह आपण गमावून बसू.

५. संभ्रम वाढतो

दुपारी जास्तवेळ झोपल्याने आपल्या मनातला संभ्रम वाढतो. आकलनशक्ती काही काळासाठी कमी होते. गोंधळलेपणा, चिडचिड जास्त प्रमाणात जाणवते, हा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पाऊण ते एक तासापेक्षा जास्त झोप घेतल्यामुळेच अशी अवस्था आपली होते. त्यापेक्षा अर्धा तासच झोप घेतली तर आपली सतर्कता वाढते, उरलेला दिवस आनंदाने घालवण्याचा उत्साहही आपल्यात येतो.

६. वजनवाढ

दुपारी झोपल्यामुळे आपल्या शरीरातलं मेदाचं म्हणजेच फॅट्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. याचा परिणाम वजनवाढीवर होतो. स्थूलता येते. यातून आजार बळावतात. दुपारी आपण जेवल्यानंतर लगेचच झोपत असू तर आपलं पचनही योग्य प्रकारे झालेलं नसतं. त्यामुळे छातीदुखी, पोटदुखीसारख्या समस्यांचा सामनाही आपल्याला करावा लागू शकतो.

७. रक्तदोषाचाही धोका

रक्त दुषित होण्याच्या समस्येबद्दल तुम्ही ऐकलं असेल. दुपारची झोप हेही त्यामागचं एक कारण मानलं जातं. कफ, पित्तदोष निर्माण होणं, तीळ, वांग, केसात कोंडा होणं यासारख्या त्वचेच्या विकारांमागेही दुपारी झोप असते असा अंदाजही शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

झोपेचं चक्र व्यवस्थित सुरु ठेवायचं असेल तर दुपारच्या झोपेऐवजी रात्रीच्या झोपेवर आपण लक्ष दिलं पाहिजे. दुपारच्या झोपेची सवय मोडणं काही दिवस कठीण जाईल, त्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागेल. पण नंतर आपोआपच ही सवय मोडेल आणि रात्री व्यवस्थित झोप पूर्ण होऊ शकेल. गेले अनेक वर्ष तुम्ही दुपारच्या झोपेचे फायदेच ऐकले, वाचले असतील. पण हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला दुपारी किती झोपावं, झोपणं का टाळावं हेदेखील समजलं असेलच. त्यामुळे दुपारी झोपा पण जरा वेळेचं भान ठेवून!

Sharing Is Caring:

Leave a Comment