गुंतवणूक करण्याचे १५ टिप्स

१. शक्य तितक्या लवकर आर्थिक नियोजन करा : आर्थिक नियोजनास विलंब करणे हे आपल्या दीर्घकालीन आर्थिक परिस्थितीस व स्वप्नांसाठी हानिकारक आहे. संकटे आल्यावर झोपेतून जागं होऊन आर्थिक नियोजन करू नका.

२. चंगळवादी जीवनशैलीपासून दूर रहा : ऋण काढून सण साजरे करू नयेत! हे वाक्य कायम लक्षात असू द्या.

३. क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा: क्रेडिट कार्ड हे अगदीच गरज असेल तरच वापरावं. उगाच क्रेडिट कार्डवर ऑफर आहे म्हणून खरेदी करणं टाळा.

४. इतरांशी तुलना टाळा : नेहमी अंथरुण पाहून पाय पसरावेत. आपल्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीने किती व कोणती वस्तू खरेदी केली यापेक्षा आपल्याला काय आवश्यक आहे? आपल्याला काय परवडेल? हे समजून घेऊन, आपली परिस्थिती ओळखून खर्च करावा.

५. महागड्या गाड्या, गॅजेट्स, जीवनशैली मुळे तुम्ही श्रीमंत फक्त दिसता, बनत मात्र नाही. बचत, गुंतवणुकीला प्राधान्य द्या..

६. दरमहा आपल्या उत्पन्नाच्या किमान ५% ते १०% बचत करा : आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे दरमहा बचत करून त्यातून भविष्याची व आपत्तीकाळाची तरतूद म्हणून गुंतवणूक करावी.

७. आपल्याला न समजणाऱ्या आर्थिक गुंतवणुकी टाळा : ज्या गुंतवणुकीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा प्रकारच्या गुंतवणुकी शक्यतो करूच नयेत आणि करायच्याच असतील तर आर्थिक सल्लागाराच्या मदतीने कराव्यात. पैसे गुंतवताना सावधगिरी बाळगा.

८. दीर्घकालीन गुंतवणूक करा : चक्रवाढ व्याजाच्या जादूचा फायदा करून घेण्यासाठी आपल्या मिळकतीपैकी बहुतांश रक्कम दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरा.

९. विमाछत्र आवश्यक ! ते खरेदी करा : विमा म्हणजे गुंतवणूक नाही तर तुमची तुमच्या स्वतःप्रति, कुटुंबाप्रति असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे, भविष्यकाळातील संकटांमध्ये आर्थिक पाठबळ देणारे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विमा खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे.

१०. आपल्या आर्थिक योजनेचे सातत्याने पुनर्मूल्यांकन आणि पुनरावलोकन करा : तुम्ही खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण आर्थिक योजना ठरवली; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केलीच नाही किंवा चुकीचे आर्थिक निर्णय घेतले आहेत. यांसारख्या गोष्टी लक्षात येण्यासाठी आर्थिक योजना आणि प्रत्यक्ष कार्यवाही यांचे सातत्याने पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. पुनर्मूल्यांकन : आपण पूर्वी ठरवलेली ध्येये बदलतात. उदा: मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद करणे महागड्या गाडीपेक्षा तुम्हाला काही वर्षांनी जास्त महत्वाचे वाटू शकते.
पुनरावलोकन : नियमितपणे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतल्यास आपल्या प्राधान्यक्रमात आवश्यक बदल करण्यास मदत होते.

११. जोडीदारासोबत सल्लामसलत: जर तुम्ही विवाहित असाल तर आपले आर्थिक ध्येय व आर्थिक समस्या यांबद्दल एकमेकांसोबत मोकळेपणे आणि प्रामाणिकपणे चर्चा करा. जोडीदार कमावता असो वा नसो, आर्थिक नियोजनात त्याची/तिची मते विचारात घ्यायला हवीत.

१२. बदलांसाठी तयार राहा: आयुष्यामध्ये अनेकदा अनपेक्षित गोष्टी घडत असतात त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या संकटांसाठी भावनिक व आर्थिकदृष्टया तयार राहा.

१३. आर्थिक विषयांवरील वाचन: आर्थिक मार्गदर्शन करणारी वर्तमानपत्रे, मासिके, वेबसाईटस, ब्लॉग्ज, सोशल मीडिया पेजेस यावरील लेख नियमित वाचा. तसेच या विषयांवरील पुस्तकेही संग्रही ठेवा.

१४. भावनांच्या आधारे निर्णय घेणं टाळा: अनेकदा भावनेच्या भरात जाऊन माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतो. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना अतिआत्मविश्वास, आत्मविश्वासाचा अभाव, निर्णयाची घाई, इत्यादी गोष्टी तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे षड्रिपू बाजूला ठेवून व्यावहारिक विचार करून स्वतः निर्णय घ्या.

१५. स्वतःवर विश्वास ठेवा: तुमची भूमिका उत्कृष्टपणे कोणी निभावू शकत असेल तर ते तुम्ही स्वतः! त्यामुळे ‘तुम्ही स्वतः अभ्यास करून विचारपूर्वक केलेलं आर्थिक नियोजन हे निश्चितच उत्तम असणार आणि त्याची अंमलबजावणीही तुम्ही योग्यरीत्या करू शकाल’ यावर विश्वास ठेवा. वरील चेकलिस्टप्रमाणे, तुम्ही निश्चित केलेल्या ध्येयानुसारच आपलं आर्थिक

नियोजन करा आणि त्यादृष्टीने त्वरित प्रयत्न सुरु करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment