स्पेशल, महाराष्ट्रात इथे मिळते झणझणीत मिसळ

‘हे तर काहीच नाही तू पुण्याची मिसळ खाऊन बघ!’ ‘भावा आमच्या नाशिकला ये मग तुला मिसळ काय असते ते कळेल.’ ‘अय! मुळमुळीत आहे एकदम, मिसळ खाऊन कशा झिणझिण्या आल्या पाहिजेत. आमच्या कोल्हापूरची मिसळ जगात एक नंबर हाय!’ मिसळीसाठीची अशी जुगलबंदी आजवर तुमच्याही कानावर आली असेल हो ना! प्रत्येकजण आमच्याकडची मिसळ चांगली असंच म्हणतं! भल्या भल्यांची भांडणं होतात. शेवटी लोकांचं मिसळवरचं प्रेम पाहता कुठली मिसळ भारी हे आपल्याला ती चाखल्याशिवाय कसं कळणार? म्हणून आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातल्या अगदी फेमस मिसळ पॉईंट्सबद्दल माहिती घेऊया!…

पुणे –

कटाकिर्रर्रर्र-कटाकिर्रर्रर्र

ही पुण्यातली सगळ्यात झणझणीत तिखट मिसळ. कर्वे रोडला गेलं की कोणालाही विचारायचं! कटाकिर्रर्रर्र मिसळ खाण्यासाठी गर्दी दिसतेच. पुण्यात असली तरी ही मिसळ मूळ कोल्हापुरी स्टाईलने बनवली जाते. यात कोल्हापूरचा तिखट मसाला वापरला जातो. म्हणून ज्यांना झेपणार नाही त्यांनी जरा कमी ताव मारावा हाच सल्ला. यांची रेसिपी अत्यंत सिक्रेट आहे. बाकी चवीला तोड नाही!

बेडेकर –

नारायण पेठेतल्या पत्रा चौकातलं छोटंसं हॉटेल म्हणजे बेडेकर. १९५५ पासून आजही लोकांची पसंती मिळणारी बेडेकर मिसळ चाखायला लोक दूरदुरुन येतात. रंगाने अगदीच लाल तिखट वाटावी अशी पण खजुराच्या पाकामुळे या मिसळला तिखट आंबट गोड चव येते जी अगदीच लाजवाब लागते. तिथलं वेगळेपण म्हणजे इथे मिसळमध्ये बटाट्याच्या फोडी टाकल्या जातात. वरून शेव, फरसाण आणि कांद्यासोबत ब्रेडच्या स्लाइस दिल्या जातात. ब्रेड बघून निराशा होते पण मिसळ लाजवाबच!पुण्यामध्ये तुळशी बागेतली ‘श्री कृष्ण भवन मिसळ’ आणि कोथरूड डेपोजवळ ‘मस्ती मिसळ’ ही दोन ठिकाणं सुद्धा मिसळसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत.

नाशिक –

झटका मिसळगंगापूर रोड जवळची झटका मिसळ अत्यंत प्रसिद्ध आहे. नाशिकची द्राक्ष आणि मिसळ या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रसिद्ध. पण जर एकाच वेळी द्राक्ष आणि मिसळ दोघांची चव चाखायची असेल तर झटका मिसळ हे ठिकाण परफेक्ट आहे. इथल्या मिसळमध्ये भरपूर मटकी, चिवडा फरसाण टाकला जातो आणि कुरकुरीत तांदळाचा पापड दिला जातो. सोबतच इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे आपल्याला द्राक्षांच्या बागेत बसून मस्तपैकी गरमागरम मिसळचा आस्वाद घेता येतो.

श्रीमंत दरबार शाही मिसळ –

राजेशाही थाटात जर मिसळ खायची असेल तर पारिजात नगरमधलं श्रीमंत दरबार इथे नक्की भेट द्या. मिसळ वाढणाऱ्या व्यक्तीचा पारंपरिक वेशभूषा आणि भोवती असणारं दरबारी वातावरण, भिंती इ.ने झक्कास वाटतं. मिसळचं म्हणाल, तर पितळेच्या ताटात मधोमध मटकी, फरसाण असतं दोन प्रकारचा रस्सा बाजूला असतो. छोट्या वाट्यांमध्ये कांदा, रबडी जिलेबी, ताक, नाचणी किंवा तांदळाचे पापड, दही आणि पाव असतो. ही मिसळ खाऊन पोट अगदी टम्म फुगतं. चव तर बेमीसाल!बर्डन फाटाजवळ साधना मिसळ आणि एम.आय.डि.सी. जवळ सातपूर कॉलोनीमध्ये शामसुंदर मिसळ ही दोन ठिकाणं देखील फार पूर्वीपासून मिसळच्या चवीसाठी प्रसिद्ध आहेत म्हणून नाशिकला गेलात की इथे ही भेट द्या .

कोल्हापूर –

ठोंबरे मिसळ –

कोल्हापुरची आन बान और शान म्हणजे ठोंबरे मिसळ. ही रविवार पेठेत भोई गल्लीत मिळते. अत्यंत तिखट झणझणीत मिसळ असते. भरपूर फरसाण, मटकी सोबत बाजूला वाट्यामध्ये एक संपूर्ण बटाटा दिला जातो. बरीक चिरलेला कांदा दिला जातो. गोड पदार्थ कोल्हापुरी मिसळ थाळीत नो चान्स!

फडतरे मिसळ –

कोल्हापुरात शिवाजी उद्यमनगर तिथे मिळणारी फडतरे मिसळ १९६८ पासून तिची चव टिकवून आहे. या मिसळमध्ये झणझणीतपणा आहेच सोबत बटाटा, मटकी, फरसाण आणि खोबरं टाकलं जातं. पाव इथे मिळत नाहीत त्या ऐवजी ब्रेड दिला जातो. पण मिसळच्या चवीला तोड नाही. ही मिसळ खायला लोकांची लाईन लागलेली असते.

मुंबई

रुपेश मिसळ –

ही मिसळ मुंबई- पुणे रस्त्याजवळ सोमाटणे फाट्याजवळ मिळते. याची खासीयत अशी की मुंबईत पाव भाजीसाठी जसं लोकांना बटरमध्ये भाजलेले पाव लागतात ती गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेऊन इथे पाव भरपूर बटरमध्ये डबडबून दिले जातात. फरसाणासोबत काकडी, टोमॅटोच्या चकत्या दिल्या जातात. मिसळीची चव मात्र तिखट झणझणीत लागते.

बुवांची मिसळ –

आतापर्यंत मिसळमध्ये कोणी चीज वापरण्याची हिंमत केली नव्हती. मात्र बुवांची मिसळ यासाठीच अधिक प्रसिद्ध आहे. मुंबई- पुणे रस्त्यावरच फरियाज हॉटेलच्या मागे बुवांची मिसळ मिळते. मिसळमध्ये भरपूर पोहे, फारसाण बटाट्याची भाजी, मटकी असं भरपूर दिलं जातं. बारीक चिरलेल्या कांद्यासोबत टोमॅटो असतोच. आणखी एक वेगळेपण म्हणजे बाजूला लसूण, कांदा, मिरची यांचा तिखट ठेचा देखील दिलेला असतो.मुंबईमध्ये विविध ठिकाणी मार्तंड मिसळ, आय लव मिसळ असेही मिसळचे ब्रॅन्डपुढे येत आहे. त्यांची मिसळीची चव भारी आहेच पण सोबतच मिसळचं संपूर्ण भरलेलं ताट हे विशेष आकर्षण ठरतं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ पॉईंट्समधली ही काही ठिकाणं आहेत. मिसळवरचं तुमचं प्रेम ठाऊक आहे. पण तुमच्या महितीतलं एखादं बेस्ट मिसळचं ठिकाण इथे दिलं नसेल तर प्लिज भडकू नका! कमेंटमध्ये त्या ठिकाणाचं नाव देऊन मिसळ कशी आहे हे देखील सांगा. आणि वर दिलेल्या मिसळच्या ठिकाणांमधील तुम्हाला कुठल्या ठिकाणाची मिसळ चाखायला आवडेल हे नक्की सांगा.

Sharing Is Caring:

2 thoughts on “स्पेशल, महाराष्ट्रात इथे मिळते झणझणीत मिसळ”

  1. ठाणे kunjavihar चि मिसळ एकदा खाऊन बघा… अस्सल मराठमोळी मिसळ काय असते ते इथे कळेल.. मिसळ म्हणजे मिक्स कढ धान्य.. हीच खरी कन्सेप्ट आहे.. पण लोकांनी स्वतः नुसार सगळी कन्सेप्ट बदलून टाकली.. पण मि आजवर खाल्लेली उत्तम मिसळ म्हणजे kunjavihar चि मिसळ.. ठाणे स्टेशन ला लागून च् आहे.. एकदा खाऊन बघा.. बकि सगळं विसराल

    Reply

Leave a Comment