१३ मे २०२२ ला ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. आणि पुन्हा एकदा आनंद दिघे हे नाव चर्चेत आलं. हा सिनेमा आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. कोण होते हे आनंद दिघे? का म्हणतात त्यांना धर्मवीर? या प्रश्नांबरोबरच जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्याबद्दल,
आनंद दिघे यांचे पूर्वायुष्य कसे होते?
आनंद चिंतामणी दिघे हे ठाण्यात टेंभे नाका, इथं वास्तव्याला होते, त्यांचा जन्म २७ जानेवारी १९५१ ला याच भागात झालेला होता. १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. त्याकाळात आनंद दिघे हे तारुण्याच्या उंबरठ्यावर होते. ठाण्यात झालेली मा. बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा त्यांनी ऐकली आणि ते प्रभावित झाले आणि शिवसेना पक्षात जायचं, हे त्यांनी पक्कं केलं. सदस्यत्वासाठी वयाची अट पूर्ण झाल्यानंतर ७० च्या कालखंडात ते शिवसेनेत सक्रियपणे सहभागी झाले. त्यांच्या घरी आई, बहीण, भाऊ असं कुटुंब होतं.
त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली?
शिवसेनेसाठी दिघे पूर्ण वेळ काम करत होते. त्यांचं काम पाहून त्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आणि दिघेंनी आपलं घरही सोडलं. जिथं पक्षाचं कार्यालय होतं, तेच त्यांनी आपलं निवासस्थान बनवलं. कार्यकर्ते त्यांना डबा आणून देत असत. या काळात त्यांनी ठाण्यामध्ये ‘आनंदाश्रम’ ही संस्था सुरू केली. या ठिकाणीच दिघे आपला जनता दरबार भरवत असत. या दरबारात लोक आपल्या अडीअडचणी घेऊन दिघेंच्याकडे येत असत. भल्या पहाटे लोकांच्या रांगा लागायला सुरुवात होत असे. लोकांनी आपल्या अडचणी सांगितल्या की लगेच दिघेंच्याकडून त्या सोडवल्या जात. करू, बघू, सांगतो, करून देतो ही राजकारण्यांची ठेवणीतली उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. व्यक्तीचा खरेपणा आणि अडचणी योग्य आहेत हे पाहून लगेच त्या दूर केल्या जात. सरळ सांगून समजत नसेल तर त्यांनी ठोकशाहीने लोकांचे प्रश्न सोडवले होते. फक्त जनमानसात नव्हे तर प्रशासनातही दिघे यांचा दरारा निर्माण झाला होता.
सामान्य आनंद दिघे ‘धर्मवीर’ कसे झाले?
संघटनात्मक बांधणी आणि देवा-धर्मावर असणारी निष्ठा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांनी टेंभी नाक्यावर पहिल्यांदा नवरात्रोत्सव सुरू केला. सर्वांत पहिली दहीहंडी सुरू केली. तरुण शिवसेनेशी जोडले जाऊ लागले. ठाण्यात धार्मिक वातावरण निर्माण झालं. धार्मिक कार्यक्रमांची केलेली त्यांनी केलेली सुरुवात बघूनच जनतेकडून त्यांना ‘धर्मवीर’ असं संबोधलं जाऊ लागलं.
धर्मवीर का होते ठाण्याचे बाळासाहेब?
ठाणे महापालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू केली त्यानंतर त्यांनी या परिवहन सेवेत अनेक शिवसैनिकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. अनेकांना व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली, स्टॉल उभारून दिले. त्यामुळे ते लोकांच्या मनात त्यांना मनाचं स्थान मिळालं. ही त्यांची लोकप्रियता आणि जनाधार यामुळेच त्यांना ‘ठाण्याचे बाळासाहेब’, अशी उपमा मिळाली. त्यांचं ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रकरणही गाजलं. १९८९ मध्ये ठाणे शहराच्या महापौर पदाची निवडणूक सेना केवळ एक मतानं हरली. सेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी काँग्रेसला मत दिलं आणि सेनेचा पराभव झाला. पुढे काहीच दिवसात खोपकरांची हत्या झाली. आणि त्याचा आरोप आनंद दिघेंवर लावून त्यांना टाडा कायद्याखाली अटक करण्यात आली, ते जामिनावर बाहेर होते. पण त्यांच्यावर झालेला हा आरोप सिद्ध करताच आला नाही.
धर्मवीराचा शेवट कसा झाला?
गणपतीचे दिवस होते. दिघेंचा २४ ऑगस्ट २००१ ला पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. दिघे कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जात होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचं दर्शन घेऊन टेंभी नाक्याकडे परत येताना एका बसवर दिघे यांची जीप आदळली. या अपघातात दिघेंच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्यालाही इजा झाली. त्यांना त्वरित सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पायाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिरावत होती. परंतु २६ ऑगस्टला संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि संध्याकाळी ७ – ७:३० च्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. अखेर रात्री १०ः३० वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याची उद्धव ठाकरे यांनी बातमी देताच हॉस्पिटल बाहेरील ठाण्यातील शिवसैनिकांनी संपूर्ण सिंघानिया रुग्णालयाला आग लावली आणि सिंघनिया पूर्णपणे जळून गेलं.
तर अशा केवळ इशाऱ्यावर कामं करवून घेणारा, लोकांच्या समस्या सोडवणारा आनंद दिघेंसारखा लोकनेता पुन्हा होणे नाही. अशा लोकनेत्यांची समाजाला कायमच गरज असते.