राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र तरीही भरतीची नेमकी तारीख काय असणार? कसे स्वरूप असणार? याविषयीची माहिती समोर समोर आली आहे. स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यात 50000 पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या साडे पाच हजार मुलांची भरती पूर्ण होत आली आहे. सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या 15 तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान आता पोलीस भरती जाहीर झाल्यापासून इच्छुक विद्यार्थ्यांनी मैदानावर सराव सुरु केला होता. कोरोना काळात राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत.
कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. अखेर महाविकास आघाडीने कोरोना सरल्यानंतर उशिरा का होईना पण पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल. पोलिसांवर खूप ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे वळसे पाटील म्हणाले.