सध्या ईडी, आयकर विभाग यांच्या सतत पडणाऱ्या धाडी आणि रोज उघडकीला येणारे आर्थिक घोटाळे ज्यात कोट्यवधी रुपयांचा समावेश आहे बाहेर येत आहेत आणि येत राहतील. पण तरीही आजवर जे मोठे घोटाळे झाले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे फिरले आणि त्यांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली अशा घोटाळयांबद्दल जाणून घेऊयात,
हर्षद मेहता घोटाळा :
हर्षद मेहताने बँकिंग प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेतला, बँकेकडून खोट्या पावत्या दाखवून कर्ज घेतलं आणि १९९२ मध्ये अनेक विभागांत शेअर्समध्ये पैसे गुंतवले आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कमी किंमतीच्या शेअर्स मध्ये कृत्रिम वाढ घडवून आणली. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी १९९१-९२ मध्ये बँकांकडून सुमारे ४,००० कोटी रुपये (४० अब्ज रुपये) शेअर्समध्ये घेतले. नफा झाला की हे शेअर्स विकून बॅंकांचं कर्ज फेडलं जाई, नुकसान कुणाचंच नाही पण हर्षदचा करोडोंचा फायदा झाला. म्हणून हे उजेडात आल्यावर त्याच्यावर ७० हून अधिक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्या आयुष्यावर “स्कॅम १९९२” ही वेबसिरीज आणि “बिग बुल” हा सिनेमाही आला आहे.
बोफोर्स घोटाळा:
बोफोर्स घोटाळा हे भारतीय घोटाळ्यांमध्ये जरा खासच म्हणून ओळखला जातो १९८० च्या दशकात, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि हिंदुजा नावाच्या एका शक्तिशाली एनआरआय कुटुंबासह क्वात्रोची हा इटालियन दलाल आणि अजिताभ बच्चन व अन्य लोकांवर, भारताच्या फील्ड हॉवित्झर तोफांचा पुरवठा करण्यासाठी बोली जिंकल्याबद्दल बोफोर्स एबीकडून दलाली मिळाल्याचा आरोप होता. स्वीडनच्या सरकारी रेडिओने बोफोर्स या स्वीडनच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादक कंपनीने केलेल्या गुप्त ऑपरेशनबद्दल एक धक्कादायक अहवाल प्रसारित केला होता, ज्यामध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जवळच्या लोकांना साधारणपणे ६४ कोटी रुपये ही दलालीची रक्कम दिली गेली.
चारा घोटाळा:
हे प्रकरण राकेश अस्थाना या सीबीआयच्या अधिकाऱ्याने उघडकीला आणले. हा घोटाळा ९०० कोटींचा होता आणि त्यात बिहारचे प्रसिद्ध नेते लालू प्रसाद यादव व अजून ५०० जणांचा समावेश होता. या घोटाळ्यामध्ये पशुधन कल्पनेत, पण त्यांचे खाद्य, त्यांना वैद्यकीय सेवा व उपकरणे यांची कंत्राटे तयार करण्यात आली होती. उदाहरणार्थ एखादं बिल सही करून घेताना एक लाख असेल तर नंतर दोन शून्य वाढवून त्याची एक कोटी रक्कम प्रत्यक्षात घेतली गेली.
कॉमनवेल्थ गेम घोटाळा:
२०१० मध्ये भारताकडे कॉमन वेल्थ गेम्सचं यजमानपद होतं. या बहुप्रतिक्षित क्रीडा सोहळ्याचा दिवस उजाडण्याआधीच, भ्रष्टाचाराच्या आरोपांची काळी छाया त्यावर पडली. अंदाजे ३५००० कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश असण्याचा अंदाज, या घोटाळ्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या पक्षांना पैसे देणे, कराराच्या अंमलबजावणीत होणारा विलंब, जास्त फुगलेली किंमत आणि कंत्राटीद्वारे उपकरणे खरेदीमध्ये घोटाळा – आणि निधीचा गैरवापर अशा गोष्टी आहेत. मुख्य आरोपी, राष्ट्रकुल खेळ आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर सीबीआयने एप्रिल २०११ मध्ये आरोप लावले आणि नंतर तुरुंगात टाकले.
तेलगी घोटाळा:
अब्दुल करीम तेलगी हे नाव आजही देशाच्या आठवणीत ठळकपणे कोरले गेले आहे. नकली स्टॅम्प पेपर छापण्याच्या बनावटीच्या आपल्या कलाने संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा हा शातीर पोलीसवाला. हा घोटाळा १२ राज्यांमध्ये पसरला होता आणि अंदाजे २०,००० कोटींहून अधिक रक्कम होती. अनेक सरकारी विभागांच्या पाठिंब्याने हा घोटाळा पहिल्या काहींपैकी एक आहे ज्याने राजकारणी आणि नोकरशहांच्या लाजिरवाण्या भ्रष्ट व्यवहारांना उजेडात आणले.
सत्यम घोटाळा:
सत्यम घोटाळा हा भारतीय कॉर्पोरेट उद्योगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे, ज्याची रक्कम १४००० कोटी आहे. कंपनीचा तत्कालीन चेअरमन, रामलिंग राजू याच्यावर अनेक वर्षांच्या हिशोबात फसवणूक केल्याचा आणि सत्यमचा महसूल आणि नफ्याचे आकडे फुगवून सादर केल्याचा आरोप होता. खोट्या व खऱ्या आकड्यांमधील फरक भरून काढता न आल्याने राजूने गुन्हा कबूल करण्याचा निर्णय घेतला. भारतातील चौथ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीने बाजार भांडवलात तब्बल रु. १०,००० कोटी म्हणजे १०० अब्ज रु गमावले कारण गुंतवणूकदार नाराज झाले आणि शेअर्समधील गुंतवणूक काढून घेतली, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये एकाच दिवसात सत्यमची ७८ टक्क्यांनी घसरण झाली.
2G स्पेक्ट्रम घोटाळा:
जे यापूर्वी सांगितले गेले नाही असे काय म्हणता येईल, ही सर्व घोटाळ्यांची जननी आहे. तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा यांना 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात कॅगने दोषी ठरवल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. ज्यामुळे राष्ट्रीय तिजोरीचे सुमारे १ लाख ७६ हजार ६४५ कोटीचे नुकसान झाले. हा घोटाळा वायरलेस रेडिओ स्पेक्ट्रम आणि दूरसंचार मंत्रालयाने खाजगी ऑपरेटरना परवाने वाटप करण्यात आले ते २००८ मध्ये आणि २००१ च्या दराने दिल्यामुळे सरकारला मोठा तोटा झाला. बरं याचा लिलाव न करता जी कंपनी आधी येईल तिला कंत्राट दिलं गेलं. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे की स्पेक्ट्रम घोटाळा बघून बाकी घोटाळेही लाजले असतील.
एवढे पैसे असताना आपल्या देशाला दारिद्र्य, भूकबळी अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. हा पैसा या गोष्टींवर खर्च केला असता तर भारत अजूनही विकसनशील देश राहिला नसता. तुमचा मत काय आहे यावर. कृपया कंमेंट करून सांगा.