आपण प्रत्येक जण कधी सार्वजनिक तर कधी खाजगी वाहनाने प्रवास करत असतो. सार्वजनिक वाहन चालवणाऱ्यांना ट्रॅफिकचे सर्व नियम माहित असतात म्हणून आपण काहीसे निवांतपणे प्रवास करत असतो. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करतो. कारण ट्रायलच्या वेळी शिकलेले सर्वच नियम आपल्या लक्षात नसतात. त्यामुळे कधी अनवधानाने आपण काही चुका करतो. काही वेळा आपली काही चूक नसेल तरी आपलं टार्गेट पूर्ण करण्याच्या घाईत असलेले ट्रॅफिक पोलीस आपल्याला अडवतात, कडक दंड आकारतात आणि आपण घाबरून दंड भरून टाकतो. म्हणूनच ट्रॅफिकचे सर्व नियमआणि कायदे एक सजग नागरिक म्हणून आपल्याला माहीत असायला हवेत.
ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर काय कराल?
प्रवासाला निघताना सर्व पेपर्स सोबत ठेवावेत. ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर आपली गाडी शांतपणे बाजूला लावा. गाडीची चावी काढून आपल्याजवळ ठेवा. त्यानंतर गाडीची कागदपत्रे दाखवा ती पूर्णत: ट्रॅफिक पोलिसांच्या हातात द्यायची नाहीत. आपली चूक काय आहे हे शांतपणे समजून घ्या. काही समस्या असल्यास आपण ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा. सोबतच ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याशी सौजन्याने वागणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवा.
जर आपण वाहतुकीचा नियम मोडला असेल तर चोवीस तासात आपल्याला दंडाधिकऱ्याकडे त्यांनी हजर करणं अपेक्षित असतं. दंड आकाराला तर त्याची पावती देणं त्यांना बंधनकारक असतं. हे न करता सोडून देण्याच्या बोलीवर तुमच्याकडून पैसे उकळत असतील आणि यात तुम्ही त्यांना सहाय्य केलं तर तुम्ही भ्रष्टाचाराला मदत कराल हे लक्षात घ्या.
ट्रॅफिक पोलीस त्यांच्या गणवेशात असणं महत्त्वाचं असतं. त्याच्या गणवेशावर बक्कल नंबर आहे का हे पहा. जर त्यांनी गणवेश न घालता आपल्याला पकडलं असेल तर आपण त्यांचं ओळखपत्र पाहण्यास मागा. त्यांनी नकार दिला तर तुम्हीही पेपर देण्यास नकार द्यावा.
ट्रॅफिक पोलिसांकडून गाडी जप्त केली जाण्याची कारणे :
आपली गाडी नो पार्किंगमध्ये लावली असेल.
आपली गाडी ज्या ठिकाणी उभी आहे त्यामुळे कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल.
नियमानुसार परवानगी नसलेल्या जागेत गाडी उभी केली असेल.
किती दंड कुठल्या चुकांसाठी आकारला जातो.
दुचाकीवरून प्रवास करताना मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातेलेले नसेल, दोन पेक्षा अधिक लोक दुचाकीवर बसले असतील, चुकीच्या वेळी दुचाकीची लाल लाईट चालू असेल तर आपल्याकडून हजार रुपये.
आपल्या गाडीची नंबर प्लेट खराब झाली असेल, गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केली असेल, चारचाकी गाडीत सीटबेल्ट लावला नसेल, लाल सिग्नल असतानाही आपण गाडी चालवत असू तर हजार रुपये.
जर गाडी अधिक वेगात चालवत असू तर दुचाकीस्वाराकडून ४०० आणि कार चालकाकडून २००० इतका दंड आकरला जातो.
गाडी चालावताना मोबाईलवर बोलत असू तर आपल्याकडून ५००० रुपये. सोबतच ९ वर्षासाठी तुरुंगाची शिक्षाही सुनावली जाते.
लायसन्स नसल्यास ३०० रुपये.
इन्शुरन्स शिवाय जर आपण गाडी चालवत असू तर २०० रुपये.
व्यक्ती वाहन चालवण्यास जर मानसिक शारीरिकरित्या सक्षम नसेल तर ५०० रुपये.
याशिवाय गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक सामान वाहून नेणं, रेड सिग्नल तोडणं, माल वाहून नेणाऱ्या गाडीत प्रवाशांना बसवणं, मोबाईलवर बोलत गाडी चालवणं, गाडी अधिक वेगाने चालवणं, मद्यपान करुन गाडी चालवणं या कारणांमुळे आपलं लायसन्स किंना तीन महिन्यांसाठी जप्त होऊ शकतं.
चलान आकारण्याचे प्रकार :
ऑन द स्पॉट चलान – आपण ट्रॅफिकचा नियम मोडला आणि त्याच वेळी आपल्याला ट्रॅफिक पोलिसाने पकडलं तर ऑन द स्पॉट चलानाचा वापर केला जातो. आपल्याला त्याच वेळी चलान देऊन दंड आकारलं जातं.
नोटीस चलान – समजा जर ट्रॅफिक पोलिसाने पकडल्यानंतर कोणी पळून जात असेल तर त्याच्या गाडीचा नंबर पाहून, चलकाची माहिती शोधून त्याच्या घरी हे चलान पाठवलं जातं. चलान भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जातो.
कोर्ट चलान – वाहन चालवताना चालकाने काही गुन्हा केला असेल तर त्यासाठी त्याला दंड सोबतच शिक्षा देण्यासाठी कोर्ट चलान दिलं जातं.
ई चलान – डिजिटलायजेशनमुळे कोणत्याही प्रकारचा नियम आणि कायदा मोडला असेल तर आपल्या फोनवर आरटीओकडून सूचना किंवा दंड भरण्याचा मेसेज पाठवला जातो.
ट्रॅफिकची संपूर्ण माहिती आपण “भारतीय यातायात नियम” या अॅपवर पाहू शकतो. शिवाय पोलिसांविषयी काही तक्रार असेल तर या अॅपवर करू शकतो. आरटीओच्या वेबसाईटवर सुद्धा यासाठी भेट देऊ शकतो. ही माहिती घेऊनच तुम्ही प्रवासाला निघा. तुमचा प्रवास सुखाचा होईल. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.