शेअर बाजार म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो भरपूर परतावा किंवा प्रचंड नुकसान! अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण शेअर्स गुंतवणुकीकडे बघतो.
शेअर बाजार कोसळून गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे : नुकसान’, ‘शेअर बाजारात घसरण, ‘कच्चे तेल कडाडले’ ‘शेअर बाजारात घबराट’, ‘सरकार त्रिशंकू होण्याची शक्यता, शेअर बाजार कोसळले’ या प्रकारच्या नकारात्मक बातम्या सारख्या बघून शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता, धनिक लोकांनी करायचा उद्योग किंवा काहीतरी खूप अवघड प्रकरण असे सर्वसामान्यांचे गैरसमज झालेले आहेत.
मुळात गुंतवणूक हाच विषय किचकट आणि नीरस वाटत असेल तर शेअर बाजार ही लांबची गोष्ट आहे. सोने, मुदत ठेवी यासारख्या इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा शेअर्स गुंतवणुकीने सर्वात जास्त परतावा गेल्या काही वर्षांत दिलेला आहे. शेअर बाजाराबद्दल थोडी माहिती आणि रस घेऊन केलेली गुंतवणूक यामुळे
तुमचे ज्ञान तर वाढतेच बरोबर आर्थिक लाभही होतो.
कोरोना संकटानंतर जगभर आर्थिक पेच निर्माण झाला होता. अनेक नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली होती. पण जे शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीशी या ना त्या नात्याने संबंधित आहेत, त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. पण ती वस्तुस्थिती म्हणून स्वीकारली पाहिजे. त्याहीपेक्षा हे कसे शक्य झाले आहे, याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या गुंतवणुकीची दिशा निश्चित केली पाहिजे.
शेअर बाजाराविषयी भारतीय समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या खूपच कमी म्हणजे सहा कोटींच्या आसपास आहे. १३७ कोटींमध्ये केवळ सहा कोटी !
जगातील भांडवली बाजारांचे मूल्य कोरोना संकटातही तब्बल ३१ टक्के वाढले. भारतात ते त्याही पेक्षा अधिक वाढले आहे. कोरोना साथ सुरू झाली तेव्हा म्हणजे मार्च २०२० ला भारतीय भांडवली बाजाराचे मूल्य १०१ लाख कोटी एवढे खाली आले होते, ते जून २०२१ मध्ये २३२ लाख कोटी एवढे झाले होते. यावरून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय नागरिकांना या काळात किती फायदा झाला असेल, याची कल्पना आपण करू शकतो.
एका वर्षभरात भारतीय शेअर बाजाराच्या मूल्यात १२१ लाख कोटी रुपयांची भर पडली, याचाच अर्थ गुंतवणूकदार तितके श्रीमंत झाले. थोडक्यात, या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करून आपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकणार नाही.. त्यामुळे पुस्तकाच्या या भागात आपण शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी माहिती घेऊयात.
एवढे सारे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना आपण काठावरच बसायचे का? शेअर बाजारातून आपण पैसा कमवायचा नाही का? या प्रश्नाचे उत्तर आहे, आपणही शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे पण त्यासाठी त्याला आधी समजून घेतले पाहिजे.
सर्वात जास्त जोखीम असलेल्या दैनंदिन ट्रेडिंगच्या वाट्याला शक्यतो जाऊ नये. आपल्याला ज्या कंपन्यांचा व्यवसाय माहीत आहे, त्या कंपन्यांत दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे. ही जोखीमही नको वाटत असेल तर म्युच्युअल फंडाच्या मार्गाने आपली गुंतवणूक त्या त्या कंपन्यांच्या फंड व्यवस्थापकाच्या हाती दिली पाहिजे.
गेल्या दोन तीन दशकांमध्ये वॉरेन बफे हे नाव समाजाच्या सर्व थरांमध्ये सुपरिचित झालं आहे. आर्थिक क्षेत्राचा गंध नसलेल्यांसाठी, ते भलीमोठी रक्कम दान करणारे, एक नव्वदीच्या आसपासचे अब्जाधीश आहेत, तर आर्थिक जगात वावरणाऱ्यांमध्ये, त्यातही गुंतवणूकदारांसाठी ते ‘विझर्ड ऑफ ओमाहा’ आहेत. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि अनुभूत सचोटी या दोन निकषांवर, त्यांनी अक्षरशः शून्यातून अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य उभारले आहे. त्यांना या गुंतवणुकीतील यशाचे रहस्य विचारल्यास, क्षणाचाही विलंब न लावता, ते आपले गुरु बेंजामिन ग्रॅहम यांनी शोध लावलेल्या ‘व्हॅल्यू इन्वेस्टींग’ चा उल्लेख करतात.
कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचं असतं.
• ज्या कंपनीचा शेअर कधीही विकण्याची वेळ येणार नाही अशा कंपनीतच गुंतवणूक करा, असे वॉरेन बफे सांगतात. या एका मंत्रावर बफे श्रीमंत झाले. केवळ श्रीमंत झाले नाहीत, तर समृद्ध आयुष्यही जगले. अर्थात त्यांचे हे गुरुपण एका दमात आपल्याला झेपणारे नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि एकूणच वेगाने बदलत चाललेले जग
समजून घेण्यासाठी आपल्याला शेअर मार्केटचा सतत अभ्यास करावा लागेल.