CNG Cars to launch in India in 2022 : देशभरात पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे नागरिक पेट्रोल-डिझेलवर (Petrol-Diesel) चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे (CNG Car) वळत आहेत. फॅक्टरी फिटेड सीएनजी गाड्यांना बाजारात सध्या मोठी डिमांड आहे. त्यामुळेच प्रमुख वाहन उत्पादक कंपन्या आता सीएनजी कार्स लाँच करू लागल्या आहेत. मेन्टेनन्सच्या बाबतीतदेखील सीएनजी कार्स या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा स्वस्त आहेत. सीएनजी कार्सच्या सेगमेंटमध्ये सध्या मारुती सुझुकी ही कंपनी आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ टाटा मोटर्सचा नंबर लागतो. सध्या बाजारात अनेक सीएनजी कार उपलब्ध आहेत पण काही कंपन्या नवीन सीएनजी मॉडेल्स सादर करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया येत्या काही महिन्यांत देशात कोणकोणत्या सीएनजी कार लॉन्च होणार आहेत. या यादीत मारुती सुझुकी बलेनो सीएनजी, मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा सीएनजी आणि टाटा अल्ट्रॉझ सीएनजी या गाड्यांचा समावेश आहे.
मारुती सुझुकी बलेनो सीएनजी
आधी सांगिल्याप्रमाणे सीएनजी सेगमेंटमध्ये मारुतीचा दबदबा आहे. कंपनी या सेगमेंटमध्ये आपला पोर्टफोलिओ विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच मारुती सुझुकी कंपनी लवकरच अपडेटेड बलेनो कारचं नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. हे बलेनोचं सीएनजी व्हर्जन असेल. बलेनो सीएनजी कारमध्ये १.२ लीटर क्षमतेचं इंजिन असेल. सीएनजीवर चालणारं हे इंजिन ७७ पीएस पॉवर आणि ९८.५ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकेल. नवीन सीएनजी बलेनो २०२२ या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिलं जाऊ शकतं. कंपनीचा दावा आहे की, नवीन सीएनजी बलेनो कार प्रति किलो ३० किलोमीटर पर्यंतचं मायलेज देऊ शकते.
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी
मारुतीची स्विफ्ट ही देशात सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. या कारचं डिझायर मॉडेल सीएनजी व्हेरिएटमध्ये उपलब्ध आहे. आता कंपनी स्विफ्टचं सीएनजी मॉडेल आणणार आहे. स्विफ्ट सीएनजी देखील डिझायरप्रमाणे १.२ लीटर ड्युअल जेट K12C पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह लाँच होऊ शकते. सीएनजी मोडवर, हे इंजिन ७६ बीएचपी पॉवर आणि ९६ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ७ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कनेक्टिव्हिटी, एलईडी हेडलॅम्प आणि टेल लाइट्स, रियर पार्किंग कॅमेरा, पुढच्या बाजूला दोन एअरबॅग आणि क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.
मारुती सुझुकी विटारा ब्रेझा सीएनजी
कॉम्पॅक्ट एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये ही कार सर्वाधिक विकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची कार आहे. सध्या, विटारा ब्रेझा १.३ लीटर मल्टीजेट डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. आता या कारचं फेसलिफ्टेड व्हर्जनदेखील लाँच करण्यात आलं आहे, जे डिझेलऐवजी पेट्रोल इंजिनसह येतं. लवकरच कंपनी या कारचं सीएनजी व्हेरिएंटदेखील लॉन्च करू शकते. नवीन मारुती सुझुकी विटारा ब्रेझामध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट आणि १.५ लीटर पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. सीएनजी मोडवर ही एसयूव्ही ९१ बीएचपी पॉवर आणि १२२ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकेल.
टाटा अल्ट्रॉझ सीएनजी
टाटा मोटर्स पेट्रोलला पर्याय असलेल्या वाहनांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत असाताना टाटा मोटर्स आता सीएनजीमध्येही हात आजमावू शकते. टाटा मोटर्स कंपनी त्यांची सीएनजीवर चालणारी अल्ट्रॉझ ही कार लॉन्च करू शकते. Altroz CNG चं टेस्टिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. सीएनजी किटसह अल्ट्रॉझमध्ये १.२ लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं जाईल. सीएनजी मोडवर, ही कार ७२ बीएचपी पॉवर आणि ९५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकेल. या कारचं एक्सटीरियरदेखील उत्कृष्ट असेल.