अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी यासंदर्भात एक पत्र लिहून लवकरच बरा होऊन मी आपणा सर्वांच्या सेवेत येणार आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत असे म्हटले आहे.
“ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे दि. २३-५-२०२२ ते दि. ३०-५-२०२२ पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. इच्छा असूनही कार्यक्रमास येऊ शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमांच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आर्शिवाद पाठीशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा. सहकार्याबद्दल धन्यवाद,” असे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कारचा अपघात झाला होता. जालन्यात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. रात्री दहाच्या सुमारास परतूरमध्ये हा अपघात झाला होता. सुदैवाने अपघातातून इंदुरीकर महाराज बचावले होते. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान त्यांच्या गाडीचा चालक मात्र अपघातात जखमी झाले होते.
इंदुरीकर महाराज गाडीने परतूर येथील खांडवी वाडी येथे जात होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचत मदत केली. सुदैवाने अपघातात इंदुरीकर महाराज जखमी झाले नाहीत. त्यांचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला होता.